Mahaparinirvan Diwas 2022 : मुंबईतल्या चैत्यभूमी परिसरात हजारो अनुयायांची गर्दी, पोलिसांचा बंदोबस्त
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईतल्या चैत्यभूमी परिसरात हजारो अनुयायांची गर्दी झाली आहे. कोरोनाचं संकट दूर झाल्यामुळं यंदा आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी अनुयायी देशभरातून हजारोंच्या संख्येनं दाखल होत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमीवर आलेल्या आंबेडकरांच्या अनुयायांसाठी शिवाजी पार्क, चैत्यभूमी राजगृह आणि बीआयटी चाळीसह विविध ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वतीनं विविध नागरी सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडूनही चैत्यभूमी, शिवाजी पार्क आणि दादर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीनं शिवाजी पार्क मैदानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. तसंच आंबेडकरांच्या छायाचित्र प्रदर्शनालाही सुरुवात झाली आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या वतीनं उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बाबासाहेबांना आदरांजली वाहतील. तसंच शासनाच्या वतीनं चैत्यभूमी परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे.