सरकार चिपळूणकरांच्या मदतीत कमी का पडलं? पूरपरिस्थितीचा अंदाज का घेतला नाही? बचावकार्यात दिरंगाई का?
मुंबई : कोकण आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांसाठी दरडींच्या घटना नव्या नाहीत. दरवर्षी संततधार पाऊस सुरु झाला किंवा कमी कालावधीत अतिजास्त पाऊस झाला, की घाट रस्त्यांवर, मुंबई परिसरातील टेकड्यांच्या उतारावर वसलेल्या घरांवर दगड, माती घसरून येण्याच्या घटना घडतात. क्वचित प्रसंगी डोंगरावरून मोठे दगड घाटातून प्रवास करणाऱ्या गाड्यांवरही पडतात. अशा घटनांमध्ये बळी जाणाऱ्या नागरिकांची संख्या दरवर्षी सुमारे तीस ते चाळीस असते.
मात्र, काही वर्षे अशीही असतात जेव्हा कोकण आणि घाट क्षेत्रावर असामान्य अतिवृष्टी होते. अशा वेळी दरडींची संख्या आणि तीव्रताही मोठी असते. 2005, 2014 आणि आता 2021. ही गेल्या दोन दशकांतील अशी वर्षे आहेत, जेव्हा असामान्य पाऊस होऊन डोंगराच्या पायथ्याशी काही गावांवर दरडी कोसळल्या आणि अनेक लोक या दरडींखाली गाडले गेले.




















