Sambhaji Raje & Udayanraje Meet : उदयनराजे-संभाजीराजे छत्रपती यांची भेट घडवणारे संदीप पटेल 'माझा'वर
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दोन्ही राजे एकत्र येणार का अशी चर्चा रंगली असतानाच, दोन्ही राजेंची भेट झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यातील व्यावसायिक संदीप पटेल यांच्या घरी ही भेट होत आहे. या भेटीनंतर दोन्ही राजे एकत्रित पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर आपापली बाजू मांडणार आहेत. राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच आज दोन्ही राजेंची बैठक होत असल्याने मराठा समाजाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकवाक्यता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यात आता एकाच प्रश्नावर म्हणजेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे चर्चेसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरातील संभाजीराजे छत्रपती यांच्या घरी जाऊन छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. तर संभाजीराजे आज पुण्यात उदयनराजेंची भेट घेत आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं काय होतं? 16 जून रोजी होणाऱ्या मराठा आंदोलनात उदयनराजे सहभागी होणार का? आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे काय भूमिका मांडतात याची उत्सुकता लागली आहे.





















