भर पावसात आजारी आजीला पाठीवर घेऊन नातू तीन किमी पळाला!
परभणी जिल्ह्यात मुख्य रस्त्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे हाल ही अत्यंत दयनीय झाले त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावकऱ्यांना मोठ्या हाल-अपेष्टा सहन करावे लागत आहेत. जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या गावात रस्ता नसल्याने चक्क आजारी आजीला तीन किलोमीटर पाठीवर घेऊन जाण्याची वेळ इथल्या एका गावकर्यावर आली. तरीही ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देत आहेत.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा या संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असणाऱ्या गावातील 85 वर्षीय कौसाबाई चाफे यांना अचानक जुलाब आणि उलट्या सुरु झाल्या. गावातील खाजगी इलाज करुनही त्यांना काहीही फरक पडला नाही. अखेर या आजीच्या 18 वर्षीय नातू राजकुमार चाफेने तिला कापडाने पाठीवर बांधून पुढील इलाजासाठी जिंतूरला नेण्याचे ठरवलं आणि चिखल तुडवत तब्बल तीन किलोमीटर पायीच घेऊन गेला.