'राज्यातल्या महामार्गांच्या कामात शिवसेना लोकप्रतिनिधींचा खोडा', गडकरींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे अनेक कामं सुरु आहेत. मात्र या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचं नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे लोकप्रतिनिधी नियमबाह्य मागण्या करत अधिकारी आणि कंत्राटदारांना काम करण्यापासून रोखत असल्याचंही गडकरींनी या पत्रात म्हटलंय. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल, महाराष्ट्र जनतेचे नुकसान होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हे पत्र नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना 27 जुलैला लिहिल्याचं समजतंय. राष्ट्रीय महामार्गाची ही कामं वेळेत पूर्ण झाली नाही तर प्रोजेक्टची किंमत वाढण्याची भीती आहे. त्यामुळे यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं असंही नितीन गडकरींनी या पत्रात म्हटलंय.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. मात्र, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषतः वाशिम जिल्हयात हे प्रामुख्याने घडते आहे.





















