Sharad Pawar Adani meet | शरद पवारांच्या घरी अदानी गेले आणि वीजबिल माफीचा निर्णय गुंडाळला: राज ठाकरे
"वीज दराविरोधात पहिलं आंदोलन मनसेनं केलं होतं. या आंदोलनात मनसैनिकांवर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मला असं वाटतं की, नागरिकांना या गोष्टीचा विचार केला पाहिजे की, यांच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं? वीज कंपन्यांकडून वाढीव बिलं सर्वांनाच येत आहेत. तुम्हाला लॉकडाऊनमध्ये त्रास झाला. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही, त्यामुळे तुम्ही जर नागरिकांना त्रास देणार असाल तर कसं होईल? सर्वात आधी मंत्र्यांनी सांगितलं की, आम्ही वीज बिलांमध्ये कपात करु. त्यानंतर एकदम घुमजाव झालं. राज्यपालांनी सांगितल्यानंतर मी शरद पवारांशी बोललो. त्यांनी सांगितलं की, त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहा आणि ते पत्र माझ्याकडे पाठवा. मी त्यांच्याशी बोलतो. त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी मला कळालं की, अदानी पवार साहेबांच्या घरी येऊन गेले. चर्चा काय झाली मला माहिती नाही. पण त्यानंतर सरकारनं निर्णय सांगितला की, वीज बिल माफ केलं जाणार नाही."
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मला निर्दयीपणा समजतंच नाही लोकांचा. एकतर पिळायचं लोकांना, त्यानंतर इतक्या निर्दयीपणे वागायचं. पैशांचा विचार करायचा नाही, अजून कशाचाही करायचा नाही. आणि वीजबिल माफ करणार नाही. हे यांच्यासोबत चर्चा झाल्याशिवाय होणारच नाही. आणि या कंपन्यांसोबत चर्चा म्हणजे, काहीतरी लेनदेन झाल्याशिवाय चर्चा थांबणारच नाहीत. सगळ्या कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करतंय."