(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Coronavirus | राज्यात दिवसभरात 10 हजार 187 नवे कोरोनाग्रस्त
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासन सातत्याने राज्यातील जनतेला कोरोनाच्या नियमांचं सक्तीने पालन करण्याचं आवाहन करत आहे. तरीही नागरिक या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहेत.
राज्यात गेल्या 24 तासात दहा हजार 187 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 08 हजार 586 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 52 हजार 440 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर 2.37 टक्के आहे.
राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 92 हजार 897 आहे. त्यात सर्वाधिक 19 हजार 615 अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात हा आकडा 11 हजार 480 इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी 10 हजारांच्या पुढे आहेत. जिल्ह्यात सध्या 10 हजार 44 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर मुंबई महापालिका हद्दीत ही रुग्णसंख्या 8 हजार 984 इतकी झाली आहे.