Maharashtra Rain Update : 5 सप्टेंबरनंतर पुन्हा पाऊस सक्रिय होणार, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
अवघे राज्य पावसाची प्रतीक्षा करत असताना, भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, राज्यात ५ सप्टेंबरनंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीये. सप्टेंबर सुरू होऊनही अद्याप राज्यातील काही धरणांमध्ये पुढील वर्षभरासाठीचा पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. तसेच, काही जिल्ह्यांमध्ये पिकं, जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे मोसमी पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार याकडे सर्वांचेच डोळे लागलेत. मात्र, येत्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरनंतर राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे सर्वांच्याच मनात एक आशादायी वातावरण निर्माण झालय.