Maharashtra Monsoon Updates : चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार
कोनाड्यात पडलेल्या छत्र्या आता बाहेर येतील... कुठल्यातरी बॅगेत ठेवलेले रेनकोटही बाहेर डोकावू लागलेत... गेल्यावर्षी खास असे घेतलेले शूज आणि सॅण्डल्सही कपाटाबाहेर येण्याची चाहूल लागलीय.. इतकंच काय तर, कांदाभजी आणि वाफाळत्या चहाचीही लज्जत जिभेला खुणावू लागलीय... पानगळल्या झाडांवरच्या शिल्लक राहिलेल्या पानांची सळसळ वाढलीय... कारण वारा सुटलाय... पण मंडळी, फक्त वारा नाही, तर याच वाऱ्याच्या हातात हात घालून तो आलाय... हो तोच... ज्याची तुम्हा-आम्हाला प्रतीक्षाय... हो... तोच पाऊस... डेरेदाखल झालाय तळकोकणात... सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात वरूणराजाने कृपादृष्टी टाकलीय. त्याचसोबत, दक्षिण महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्याचसोबत, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रचा काही भाग मान्सूनने व्यापलाय. महत्त्वाचं म्हणजे, येत्या चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह धारानृत्य पाहायला मिळण्याची शक्यताय. उकाड्याने हैराण झालेल्या आणि बहुतांश धरणांनी तळ गाठलेल्या महाराष्ट्राला येत्या चार ते पाच दिवसांत मोठा दिलासा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.