Maharashtra Rain : राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा, अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
Maharashtra Unseasonal Rain : राज्यावर कोरोना प्रादुर्भावासोबतच अवकाळीचं संकटही घोंगावतंय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, काल (शनिवारी) राज्यात काही ठिकाणी पहाटेपासूनच हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पहाटे रिमझिम पाऊस झाला. तर अनेक भागांत गारपीट झाली. त्यामुळे शती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 10 जानेवारीदरम्यान राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात गारपिटीचा इशारा देखील नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. तसेच पश्चिम विदर्भातील अमरावतीत देखील एक-दोन ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रबी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे.