(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक कधी? राज्यपालांची ठाकरे सरकारला पत्रातून विचारणा
मुंबई : पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडावा का? या विचारात ठाकरे सरकार असताना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले आहे. विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असे पत्र राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. राज्यपालांनी 24 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात महत्वाच्या तीन मुद्दयांवर लक्ष वेधले आहे. यामध्ये त्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी प्रमुख मागणी देखील केली आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन हे 5 आणि 6 जुलै रोजी होत असून, हा कालावधी वाढवावा अशी मागणी राज्यपालांनी केली आहे. तसेच दुसरा महत्वाचा मुद्दा राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटला आहे. तो म्हणजे विधानसभा अध्यक्ष पद लवकरात लवकर भरावे. तर तिसरा मुद्दा ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्यामुळे या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेऊ नये, असे राज्यपाल म्हणाले.