(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmer Loss : बळीराजा संकटात; पावसाअभावी कपाशीला हाताने पाणी देण्याची वेळ
शेतकऱ्यावर यंदा पावसामुळे दुहेरी संकट आलंय. पाऊस आला तरी तो प्रमाणापेक्षा जास्त बरसल्यानं पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील बळीराजा अडचणीत आलाय. तर तिकडे उत्तर महाराष्ट्रात पाऊस नसल्यानं शेतकऱ्याला पीकं जगवण्यासाठी हातानं पाणी देण्यासाठी धडपड करावी लागतेय. नाशिक जिल्ह्यातल्या पूर्व भागात यंदा जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. पण त्यानंतर पावसानं दडी मारली. त्यामुळे जूनच्या सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र, आता जोरदार पावसाची अपेक्षा असताना रिमझिम पाऊस पडत असल्यानं मक्यासारख्या पिकांनी तग धरला. पण कपाशीला जोरदार पावसाची अपेक्षा आहे. त्य़ामुळे हातानं पिकांना पाणी देण्याची वेळ बळीराजावर आलीय. याउलट चित्र पुण्यात पाहायला मिळतंय. मावळमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे मावळ तालुक्यातील भात शेतकरी चिंतेत आहे. पंधरा हजार हेक्टरपैकी २५० हेक्टर क्षेत्र वाहून गेलंय. तर एकूण अकराशे हेक्टर पिकाचं नुकसान झालंय.