Sanjay Raut Samana Allegations : दादा - शिंदे ते गडकरी - शाह, राऊतांच्या आरोपांमध्ये किती तथ्य?
Sanjay Raut Nitin Gadkari Special Report :
Sanjay Raut : नागपूरमध्ये (Nagpur Loksabha) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामध्ये नितीन गडकरींवरून मोदी शाह आणि फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात. जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे 'योगी को बचाना है, तो मोदी को जाना है' हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल.
महाराष्ट्राने मोदी शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राने मोदी शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले, ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशाचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला. लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेले सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केले, असा आरोप संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून केला आहे.