Devendra Fadnavis Full PC : पेटत्या महाराष्ट्रावर आपली पोळी भाजण्यासाठी विरोधकांची गैरहजेरी -फडणवीस
Devendra Fadnavis Full PC : पेटत्या महाराष्ट्रावर आपली पोळी भाजण्यासाठी विरोधकांची गैरहजेरी -फडणवीस ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलावलेल्या बैठकीला महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. दरम्यान बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधी पक्षावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे फडणवीसांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणाच्या महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली होती. मात्र ऐनवेळी विरोधीपक्षाने, मविआने या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांना मराठा आरक्षणासारख्या विषयासाठी वेळ नाही. मात्र वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर राजकीय बैठक करायला वेळ आहे. यावरुन त्यांची राजकीय जात ओळखू येते. बाळासाहेब आंबेडकर यांनी एक महत्वाची भुमिका मांडली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे मुद्दे लेखी मागितले पाहिजे.आजची बैठक ही जातीय सलोखा राखण्यासाठी आयोजित केली होती. उपस्थितांनी ज्या काही सुचना मांडल्या आहेत त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य ते निर्णय घेतील. मला वाटले होते की शरद पवार तरी उपस्थित राहतील. मात्र महाराष्ट्र पेटत राहावा आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजत राहावी अशी विरोधी पक्षाची भूमिका आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.