Buldhana News : मलकापुरातील कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू,नातेवाईकांचा आरोप
बुलढाणा : बुलढाण्यातील मलकापूर उपजिल्हा रुग्णालाय आणि कोविड सेंटरमधील वीजपुरवठा तब्बल दीड तास खंडित झाल्याने, रुग्णालयात भरती असलेल्या 25 रुग्णांचे प्राण टांगणीला लागले होते. त्यातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर असलेल्या एका कोविड रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले. हा धक्कादायक प्रकार तब्बल दीड तास सुरु असल्याने कोविड सेंटरमधून रुग्ण बाहेर आले होते. रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णाला जीव गमवावा लागल्याचं म्हटलं जात आहे.
रुग्णालयाचा विद्युत पुरवठा काल (30 एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास खंडित झाल्याने कोविड सेंटरमधील रुग्ण अक्षरशः बाहेर आले. तर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या दोन रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. त्यातील 35 वर्षीय प्रेमसिंग राजपूत नावाच्या रुग्णाला आपला प्राण गमवावा लागला. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी आपले रुग्ण दुसरीकडे हलवण्याची तयारी केली. पण नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी रुग्णाच्या नातेवाईंकांना धीर देत वीज येईपर्यंत थांबवलं.
वीजपुरवठा खंडित झाला त्यावेळी रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. नाफडे हे कामानिमित्त अकोला इथे गेले असल्याची माहिती मिळाली. यानंतर एबीपी माझाने थेट रुग्णालय गाठून तिथल्या परिस्थितिचा अढावा घेतला असता रात्री 10.45 वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याचं समजलं. रुग्णालयाच्या कोविड रुग्ण विलगीकरण कक्षाला भेट दिली असता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोविड रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी नेमून दिलेला सिक्युरिटी गार्ड झोपलेला होता तर कोविड पॉझिटिव्ह प्रत्येक रुग्णाचे एक-दोन नातेवाईक या रुग्णाच्याच बेड खाली झोपले होते. हा प्रकार एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबद्दल तिथे हजर असलेल्या डॉक्टरांना विचारणा केली असता, हा जणू नित्याचा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं. तात्काळ तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना फोनवरुन याबाबत माहिती देण्यासाठी कॉल केला असता, त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याचं समजलं. तर रुग्णालयात एकही वरिष्ठ डॉक्टर हजर नसल्याचं अनेक रुग्ण सांगत होते. इतकंच नाही तर रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाला पाणी देण्यासाठीही कोणी कर्मचारी नसल्यामुळे, आम्हाला नातेवाईकांना विलगीकरण कक्षात येण्याचं इथले डॉक्टरच सांगतात, असं नातेवाईकांनी सांगितलं.
दरम्यान रुग्णालयातील जनरेटर अशा महामारीच्या काळात देखील गेल्या तीन ते चार महिन्यापासून ना दुरुस्त असल्याने व्हेंटिलेटरवरील एका रुग्णाला जीव गमवावा लागला. पण याची जबाबदारी घेण्यास कोणाची हा प्रश्नच आहे. तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांचा फोन स्विच ऑफ होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नाफडे हे आपल्या वैयक्तिक कामानिमित्त अकोला इथे गेले होते ते रात्री तीन वाजेपर्यंत देखील आले नव्हते. यावरुन प्रशासन कोरोना रुग्णाप्रति आणि कोरोना प्रतिबंधासाठी किती संवेदनशील आहे हे समोर येत आहे.