(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus New Guidelines : राज्यात आता प्रवासासाठी E-Passची गरज नाही, माहितीसाठी पहा ही बातमी
मुंबई : येत्या सोमवारपासून (7 जून) तुम्हाला जर गावी जायचं असेल तर विना ई-पास (E-Pass) जाणं सहज शक्य होणार आहे. कारण अनलॉकच्या गटनिहाय जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असेल. शिवाय, प्रवास करताना पाचव्या गटातील कुठल्याही भागात तुमचा थांबा म्हणजेच स्टॉप असेल तर मात्र तुम्हाला ई-पास बाळगणं अनिवार्य करण्यात आलंय. पण दिलाशाची बाब अशी की, सध्या राज्यातील कुठलंही शहर किंवा जिल्ह्याचा पाचव्या गटात समावेश नाही. त्यामुळे आतातरी कोणालाही आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची गरज भासणार नाही.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली होती. ज्याअंतर्गत राज्यात 'ब्रेक दि चेन'अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले होते. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली होती. अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची काढणे बंधनकारक होते. नागरिकांना काही महत्त्वच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढणे अनिवार्य होते.
अर्थात यावर स्थानिक प्रशासनाचा निर्णयही महत्वाचा असेल. पुढच्या सोमवार ते रविवारपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी ही एक दिलाशाची बातमी आहे. त्यानंतर पुढच्या शुक्रवारी प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर स्थानिक प्रशासन आपल्या जिल्ह्याचा कुठल्या गटात समावेश होतो, हे जाहीर करुन त्यानुसार तिथे निर्बंध लागू होतील.