Baramati Lok Sabha Special : Ajit Pawar यांचं बारामती गणित बिघडणार? नेमकं प्रकरण काय?
अकोला: अजितदादांचं (Ajit Pawar) राजकारण हे सगळ्यांना माहिती आहे, ते शब्द पाळतात, शब्द फिरवत नाही, पाठीत खंजीर कोण खुपसला याचं उत्तर अंकिता पाटलांनी (Ankita Patil) द्यावं असं प्रत्युत्तर अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिलं. आपण महायुतीमध्ये एकत्रित आहोत, त्यामुळे खंजीर खुपसण्याची भाषा करून महायुतीत संभ्रम निर्माण होईल अशी भाषा करू नये असा सल्लाही मिटकरींनी अंकिता पाटलांना दिला. अंकिता पाटलांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर अमोल मिटकरींनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.
अजित पवारांनी आपल्याला तिनदा शब्द देऊनही पाठीत खंजीर खुपसला असा आरोप अंकिता पाटलांनी केला होता. आता विधानसभेला आमचं काम केल्यानंतरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू असा इशाराही दिला होता. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अंकिता पाटलांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे अजित पवार गट नाराज झाल्याचं दिसतंय. त्यामुळे इंदापुरात अजित पवार गट आणि हर्षवर्धन पाटलांच्या गटामधील वादही वाढण्याची चिन्हं आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने अंकिता पाटलांना उत्तर दिलं आहे.