Karun Sharma Case : करुणा शर्मा यांना पिस्तुल प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी : ABP Majha
बीड : करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना आज न्यायालयात दाखल केलं. कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपी अरुण मोरे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर काल वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर करुणा शर्मा यांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला. मात्र करुणा शर्मा यांनी जामीन अर्जावर सही केली नसल्याची माहिती आहे. माझा वकील आल्या शिवाय जामीन अर्ज करणार नाही, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. आपण हा गुन्हा केला नसल्याचं करुणा शर्मा यांनी कोर्टासमक्ष सांगितलं आहे. करुणा शर्मा यांना बीड शहरातील जिल्हा कारागृहात नेणार असल्याची माहिती आहे.