Abdul Sattar Vidhansabha Constituency : अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात 27 हजार दुबार नावं ?
Abdul Sattar Vidhansabha Constituency : अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात 27 हजार दुबार नावं ?
राज्यात विधानसभा निवडणूकांची तयारी आता सगळेच पक्ष करत आहेत. पण महायुतीतच आता वाद वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात 27 हजार दुबार नावं असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षानंच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यात 85 टक्के मुस्लिम समाजाची नावं असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांचा असून पालकमंत्री अब्दुल सत्तारांनीच ही नावं घुसवल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाला पत्र दिल्याची माहिती 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे.
यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंनीही अशाच स्वरुपाचा आरोप केल्यानंतर आता खुद्द भाजपनेच अब्दूल सत्तारांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभेसाठी सिल्लोडच्या जागेसाठी महायुतीतच रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तारांनीच दुबार नाव घुसवल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात भाजपनेच अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात २७ हजार दुबार नाव असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे. यात ८५ टक्के मुस्लिम समाजाची नावं दुबार असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. त्यावर फोटोदेखील दुबार आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही दुबार नावं घुसवल्याचा आरोप करण्यात आला असून ही नावं तात्काळ काढून टाकावीत अशा अर्थाचे पत्र भाजपकडून प्रशासनाला देण्यात आलंय. शिवाय अब्दुल सत्तार यांनी लोकसभेत जो युतीचा धर्म निभावला त्याच पद्धतीनं आम्ही युतीचा धर्म निभवला असल्याचं देखील भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय.
काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमवर दुबार मतदानाचा आरोप करता नव मतदारसंघांपैकी ३ मतदारसंघात १ लाख बोगस नावं असल्याची तक्रार केली होती. आता सिल्लोड मतदारसंघात दुबार नावांचा प्रश्न समोर येत आहे.