(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC : मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील व्यवहारांची कॅगकडून चौकशी सुरुवात
BMC : मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातल्या व्यवहारांच्या चौकशीला कॅगच्या पथकाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी राज्य सरकारनं कॅग चौकशीचा बडगा उगारल्याचं बोललं जात आहे. मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कोरोना काळात झालेल्या १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कामांचं कॅगद्वारे विशेष लेखापरिक्षण करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं कॅगला पाठवलेल्या प्रस्तावानुसार मुंबई महापालिकेत २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीतल्या कामकाजाचं परिक्षण होणार आहे. कॅगच्या दहा अधिकाऱ्यांच्या पथकानं आज सकाळी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली, अशी माहिती आहे. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेची सत्ता होती. कोरोना संकटादरम्यानच्या सव्वा दोन वर्षांत मुंबई महापालिकेत निविदा न मागवता कंत्राटं देण्यात आल्याचा आरोप आहे. त्या व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार आणि गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे.