(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Baba Ramdev Withdraws Comments: अॅलोपॅथी उपचारांबाबत केलेलं वक्तव्य रामदेव बाबांकडून मागे
नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं आहे. योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूंमागे अॅलोपॅथी कारण असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर डॉक्टर्स आणि संघटनांकडून संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी पत्र लिहित रामदेव बाबांना वक्तव्य पूर्णपणे मागे घेण्याचं आवाहन केलं होतं.
बाबा रामदेव यांनी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'डॉ. हर्ष वर्धन जी आपलं पत्र मिळालं. त्यासंदर्भाने चिकित्सा पद्धतीवरील संघर्षाच्या या पू्र्ण वादाला मी विराम देत आहे. मी माझं वक्तव्य मागे घेत आहे. आम्ही अॅलोपॅथीचे तथा आधुनिक उपचार पद्धतीचे विरोधक नाही. आम्ही हे मान्य करतो की जीव वाचवण्यासाठी आधुनिक अॅलोपॅथीनं खूप प्रगती केली आहे आणि मानव सेवा केली आहे. माझं जे वक्तव्य कोट केलं आहे ते मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हॉट्सअॅपवरील आलेला मेसेज वाचून दाखवलेलं आहे. यामुळं कुण्याच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.