Vinesh Phogat Wrestling : विनेशचा कुस्तीला रामराम; कुस्ती जिंकली मी हरली म्हणत जाहीर केली निवृत्ती
Vinesh Phogat Wrestling : विनेशचा कुस्तीला रामराम; कुस्ती जिंकली मी हरली म्हणत जाहीर केली
भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिनं कुस्तीला (Wrestling) अलविदा केलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत विनेशनं याबाबत माहिती दिली. विनेश फोगाटनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आई... कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ कर मला, तुझे स्वप्न, माझं धैर्य, सगळं काही संपलंय, यापेक्षा जास्त ताकद आता माझ्यात राहिलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल, मी ऋणी राहीन.", असं म्हणत जड अंतःकरणानं विनेशनं प्राणाहून प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा म्हटलंय.
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वॉलिफाय झाली खरी, पण ती अंतिम फेरीपर्यंतची मजल मारेल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण ती जिद्दीनं लढली. तिनं एकापाठोपाठ एक असे तीन सामने खेळले. अन् मोठ्या थाटात अंतिम फेरी गाठली.
विनेश फोगाटनं तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना 5-0 च्या फरकानं जिंकला. प्रतिस्पर्ध्यासाठी तिनं साधा एक गुणंही सोडला नव्हता. त्यावेळी विनेशची देहबोली प्रत्येक भारतीयाला जणू सांगत होती की, तयारी करा मी गोल्ड घेऊन येतेय. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण, काही ग्रॅम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. तिला लढायचं होतं, पण रणांगणात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली.