Twitter Grievance Officer : ट्विटरकडून अखेर तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती
नवी दिल्ली : ट्विटरने विनय प्रकाश यांची भारतासाठी कंपनीचे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. दिल्ली हायकोर्टात गुरुवारी कंपनीने माहिती देताना सांगितलं होतं की, आयटी नियमांतर्गत तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक लवकरच करणार आहोत. यासंदर्भातील प्रक्रिया सुरु आहे. 11 जुलै रोजी अधिकृतपणे कंपनीकडून तक्रार निवारण अधिकाऱ्याची घोषणा केली जाईल. हायकोर्टात दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरच्या अधिकृत वेबसाईटवर विनय प्रकाश यांची भारतासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची माहिती देण्यात आली आहे.
दिल्ली हायकोर्टानं 31 मे रोजी अधिवक्ता अमित आचार्य यांच्या याचिकेवर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला नोटीस जारी केलं होतं. काही महिन्यांपूर्वी भारत सरकारनं नवे आयटी नियम लागू केले होते. त्यासोबतच सर्व सोशल मीडिया कंपन्यांनी या नियमांचे पालन करणं बंधनकारक असेल असंही सांगण्यात आलं होतं. परंतु, सरकारनं स्पष्ट निर्देश देऊनही ट्विटरनं या नव्या नियमांसंदर्भात कोणतीही ठोस पावलं उचली नव्हती. त्यानंतर हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात पोहोचलं. गुरुवारी याप्रकरणी सुनावणी दरम्यान, ट्विटरच्या वकीलांनी तक्रार निवारण अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी काही दिवसांचा कालावधी मागितला होता.