(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut : कंगनाची बाष्कळ विधानांची मालिका सुरूच! थेट गांधीजींवर निशाणा
मुंबई : 'तुम्ही एकतर गांधीजींचे फॅन होऊ शकता किंवा नेताजींचे समर्थक. तुम्ही एकाच वेळी दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय स्वत: घ्या.' असं कंगना पुन्हा एकदा बरळली आहे. आपल्याला स्वातंत्र्य हे भीकेच्या स्वरुपात मिळालंय, तुम्ही विचार करुन तुमचे हिरो ठरवा असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केलं आहे. कोणत्याही विषयावर आपल्या अकलेचे तारे तोडणाऱ्या कंगनाने आता थेट इतिहासात उडी घेत गांधीजी (Mahatma Gandhi) आणि सुभाषबाबू (Netaji Subhash Chandra Bose) जणू काही एकमेकांचे विरोधकच होते असं चित्र निर्माण केलं. बरं, असंही नाही की कंगनाने तिच्या वक्तव्याला काही ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत. पण कंगनाने सुभाषबाबूंच्या अंगरक्षकाच्या एका बातमीचा संदर्भ दिला आणि तिच्या वक्तव्याने सोशल मीडियावर गांधी विरुद्ध नेताजी अशी चर्चा मात्र सुरु झालीय. ही दोघं खरोखरच तसे विरोधक होते का? किंवा या दोघांत मनभेद होते का? याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे. गांधीजी आणि नेताजी सुभाषबाबूंचे वैचारिक मतभेद जरूर होते पण त्यांच्यामध्ये मनभेद नव्हते.