(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Cases : 11 राज्यात ओमायक्रॉनचे 101 रुग्ण; महाराष्ट्रात 32 पैकी 25 जणांची ओमायक्रॉनवर मात
Omicron Variant Cases in India : कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. देशातील ओमयाक्रॉनबाधित रुग्णांची संख्या शंभरीपलीकडे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, '11 राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. मागील 20 दिवसांत देशातील दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची नोंद दहा हजारांपेक्षा कमी झाली आहे. पण ओमायक्रॉनचं स्वरुप आणि इतर देशातील वाढत्या ओमायक्रॉन रुग्णाची संख्या पाहाता आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. 11 राज्यात ओमायक्रॉनचे 101 रुग्ण झाले आहेत.'
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चा हवाला देत म्हटले की, ' दक्षिण आफ्रिकेत डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरियंट अधिक वेगानं पसरत आहे. ज्या ठिकाणी समुह संसर्गाची (कम्युनिटी ट्रांसमिशन) शक्यता असते, त्या ठिकाणी ओमायक्रॉनचा प्रसार डेल्टापेक्षा अधिक वेगानं होऊ शकतो. जगभरात ओमायक्रॉन अतिशय वेगानं पसरत आहे. याचा भारतातही संसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे गरज नसल्यास प्रवास करणं टाळायला हवं. जिथं समूह संसर्गाची भीती आहे, अशा ठिकाणी जाणं टाळावं. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. नव्या वर्षाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याची गरज आहे. ' ओमायक्रॉन विरोधात लस प्रभावी ठरत नाही, असे अद्याप कोणत्याही संशोधनातून समोर आलेलं नाही. त्यामुळे सर्वांनी लसीकरण लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, असेही अग्रवाल म्हणाले.