(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi Lockdown | दिल्लीत लॉकडाऊन; स्थलांतरचा दुसरा अध्याय सुरु, मजुरांनी धरली गावाची वाट
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात झालेलं मजुरांचं स्थलांतर हे फाळणीनंतरचं सर्वात मोठं स्थलांतर म्हणून पाहिलं जात होतं. याच स्थलांतराचा दुसरा अध्याय आता राजधानी दिल्लीत सुरु झालाय. काल सहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा झाली आणि पुन्हा मजुरांची पावलं गावाकडे वळू लागलीयत. दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा मजुरांची गर्दी रेल्वे स्टेशन, बस स्टँडकडे वळू लागली. आनंद विहार बस स्टेशनवर तर मुंगीला पाय ठेवायला जागा नाही असं चित्र काल संध्याकाळपासूनच होतं. कुणी उत्तर प्रदेशला चाललं तर कुणी बिहारला. काहीही करुन बस किंवा रेल्वेत पहिली जागा मिळवायची. कारण पुन्हा पायी चालत जाण्याची वेळ येऊ नये हीच त्यांच्या मनातली भीती.
दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. शेजारच्या उत्तर प्रदेशात मात्र अजूनही लॉकडाऊन नाहीय. त्यामुळे किमान बसेस आणि इतर वाहतुकीची व्यवस्था यावेळी मजुरांना तातडीनं उपलब्ध होतेय. सरकार सुरुवातीला कमी दिवसांचा लॉकडाऊन लावतं आणि नंतर त्याची मुदत वाढवतं ही भीती त्यांच्या मनात पक्की बसलीय. त्याचमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली न सोडण्याचं आवाहन करुनही मजुरांची भीती कमी झालेली नाहीय.
लॉकडाऊनच्या पहिल्या लाटेदरम्यान मजुरांचं मोठ्या प्रमाणातलं स्थलांतर हे चर्चेचा विषय बनलं होतं. अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना शहरात जगणं मुश्कील झालं. आणि रेल्वे, बस, वाहनं बंद असतानाही अगदी चालत काहींनी हजारो किलोमीटरची वाट तुडवली. लॉकडाऊन हा गरिबांच्या जगण्याचे हाल करतो. त्यामुळे त्यांच्या खात्यात सरकारने किमान मदत जमा करायला हवी अशी मागणी विरोधक पुन्हा करतायत.
लॉकडाऊन हा कोरोनावर लढण्याचा एकमेव उपाय नाहीय. आरोग्य व्यवस्था कोलमडू नये म्हणून तो लावावा लागल्याचं काल अरविंद केजरीवाल यांनीही स्पष्ट केलं होतं. पण याच लॉकडाऊनमुळे या मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. रोजंदारीवर पोट असणाऱ्यांना दहा दिवसांचा लॉकडाऊनही जगण्याची भ्रांत निर्माण करतो. त्याचमुळे स्थलांतराचा हा दुसरा अध्याय राजधानी दिल्लीत सुरु झालाय. व्यवस्थेवरचा अविश्वास इतक्या ढळढळीतपणे पुन्हा व्यक्त होताना दिसतोय.