नाशिक : नांदगावमध्ये मनोरुग्णानं कुऱ्हाडीनं वार करुन तिघांना संपवलं, आरोपी अटकेत
नाशिकच्या नांदगाव तालुक्यात मनोरुग्णानं कुऱ्हाडीनं वार करून 3 जणांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळं संपूर्ण हिंगण देहरे गाव हादरून गेलं आहे. 3 जणांची हत्या करणारा मनोरूग्ण काहीच दिवसांपूर्वी गावात परतला होता. आज सकाळी तो कुऱ्हाड घेऊन घराबाहेर पडला. सर्वात पहिले स्वतःच्या आजोबांची कुऱ्हाडीनं वार करुन हत्या केली. नंतर त्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या मोटरसायकलस्वाराला सावज केलं. मात्र तेवढ्यावरच तो थांबला नाही. गावाच्या बंधाऱ्यावर जाऊन त्यानं आणखी एकाची हत्या केली आणि तो मंदिरात जाऊन बसला. त्यानंतर सावध झालेल्या गावकऱ्यांनी मनोरुग्णाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. बुवाबाजीच्या नादाला लागल्यामुळं आरोपी मानसिक रुग्ण झाल्याचं समजतं आहे.






















