(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : सर्व्हिस चार्ज आकारल्यानं रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड!
मुंबईतल्या लोअर परळ भागात असलेल्या पंजाब ग्रील या रेस्टॉरंटला सर्व्हिस चार्ज आकारणं चांगलंच महाग पडलं आहे. 181 रुपये 5 पैशाच्या सर्व्हिस चार्जपायी आता रेस्टॉरंटला दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
आयपीएस अधिकारी जयजीत सिंह 12 ऑगस्टला या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेव्हा त्यांचं जेवणाचं बिल 1810 रुपये झालं. त्यावर दहा टक्क्यांचा सर्व्हिस चार्ज आकारण्यात आला होता. यावरुन जयजीत यांनी रेस्टॉरंटच्या मालकाशी वाद घातला आणि सर्व्हिस चार्ज भरणार नसल्यात सांगितलं.
मात्र, रेस्टॉरंटच्या मालकाने सर्व्हिस चार्ज काढण्यास नकार दिला. त्यानंतर जयजीत सिंह याविरोधात ग्राहक कोर्टात गेले आणि त्यांनी तक्रार नोंदवत नुकसान भरपाईची मागणी गेली. ग्राहक न्यायालयात जेव्हा हे प्रकरण उभं राहिलं तेव्हा रेस्टॉरंट मालक नोटीस बजावूनही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कोर्टाने जयजीत सिंह यांच्या बाजूने निकाल देत जयजीत यांनी 10 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
ही नुकसान भरपाईची मिळालेली रक्कम जयजीत यांनी मुख्यमंत्री कल्याण निधीला देणाचा निर्णय घेतला आहे. नवीन कायद्यानुसार सर्व्हिस चार्ज देणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे.