(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mamata Banerjee Wins Nandigram : ममता बॅनर्जी यांचा विजय, अटीतटीच्या लढतीत शुभेन्दु अधिकारींचा पराभव
कोलकाता: देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांनी 1200 मतांनी विजय मिळवला आहे.
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या कलावरून सध्या तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असंच दिसतंय. पण नंदीग्राममध्ये मात्र सुरुवातीपासूनच अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. सुरुवातीला भाजपच्या शुभेन्दु अधिकारी यांनी ममतांना पिछाडीवर टाकत मोठी आघाडी घेतली होती. नंतर काही वेळाने ममता दीदींनी पुन्हा कम बॅक करत 2700 मतांची आघाडी घेतली. पण ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. नंतर लगेचच शुभेन्दु अधिकारी पुन्हा एकदा आघाडीवर गेले. नंदीग्राममधील मतमोजणीमुळे क्षणाक्षणाला अनेकांचा काळजाचा ठोका चुकत होता.
नंदीग्राममध्ये नंदीग्राम एक आणि नंदीग्राम दोन असे भाग पडतात. पहिल्या भागात शुभेन्दु अधिकारी आघाडीवर होते. दुसऱ्या भागातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर ममतादीदींनी आघाडी घेतली. सध्याच्या कलानुसार, तृणमूलने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना 213 च्या वर जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपनेही 77 जागांवर आघाडी घेतली आहे.
नंदीग्राममध्ये चुरशीने 88 टक्के मतदान झालं होतं. या मतदार संघात मुस्लिम मते निर्णायक आहेत. गेल्या निवडणूकीत तृणमूलचे उमेदवार असलेल्या शुभेन्दु अधिकारी यांनी डाव्या पक्षाच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.
मागील 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा वोट शेअर 44.9 टक्के होता तर भाजपचा 10.2 टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला 37.9 टक्के मतं मिळाली होती तर इतरांच्या खात्यात 7 टक्के मतं होती.