Exams : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय, मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा गायकवाड करणार चर्चा
मुंबई : सीबीएसई बारावीच्या परीक्षेसंदर्भात व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षांबाबत आज केंद्र आणि राज्यातील मंत्र्याची उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, प्रकाश जावडेकर यांच्यासोबतच राज्यांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. बैठकीनंतर, 'विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ' , अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.


















