अनिल देशमुखांविरोधातलं पत्र मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा परमबीर सिंह यांचा खळबळजनक आरोप
मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावलेत. राज्य सरकारनं परमबीर सिंह यांच्याविरोधात सुरू केलेल्या दोन प्रकरणांतील प्राथमिक चौकशीला त्यांनी विरोध केला आहे. आपण राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लिहिलेल्या पत्राचा हा परिणाम असल्याचा आरोप करत याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. गुरूवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली. राज्य सरकारतर्फे याप्रकरणी उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेण्यात आल्यानं हायकोर्टानं यावर येत्या सोमवारी 4 मे रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.























