गोंदियात बारब्रिक कंपनीतर्फे राष्ट्रीय महामार्गाचं काम, अर्धवट कामाचा नागरिकांना त्रास, सहा महिन्यात 8 जणांचा मृत्यू
Gondia News : गोंदियात बारब्रिक कंपनीतर्फे सुरु असलेली राष्ट्रीय महामार्गाची कामं मृत्यूला आमंत्रण देत आहेत. तक्रार करुनही बारब्रिक कंपनी दुर्लक्ष करत आहे.गेल्या सहा महिन्यात आठ जणांचा मृत्यू झाला 25 च्या वर लोक झाले जखमी आहेत.
Gondia News : गोंदिया (Gondia) जिल्ह्यात सध्याच्या घडीला तिरोडा ते गोंदिया आणि गोंदिया ते आमगाव या रस्त्याचं काम बारब्रिक कंपनीमार्फत (BARBARIK CONSTRUCTION PRIVATE LIMITED) सुरु आहे. गेल्या एक वर्षापासून कासव गतीने सुरु असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुसरीकडे बारब्रिक कंपनीने एका बाजूला रस्ता तयार केला तर दुसऱ्या बाजूला तीन फूट खोल खड्डा खोदून ठेवल्याने याच खड्ड्यातून तोल चुकवताना आठ जणांचा अपघाती मृत्यू झाला तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. एवढं होऊनही बारब्रिक कंपनीला जाग आलेली नाही.
जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास
गावांना तालुका मुख्यालयाशी तसंच तालुक्याला जिल्हा मुख्यालयाशी जोडण्यासाठी तर जिल्ह्याला राज्याशी जोडण्यासाठी रस्ते निर्माणाची कामं सुरु आहेत. मात्र हिच कामं आता लोकांसाठी डोकेदुखी ठरत असून रस्ते अपघातात वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता तिरोडा ते गोंदिया 35 किलोमीटर आणि गोंदिया ते आमगाव 25 किलोमीटर हा अंतर कापायला यापूर्वी दीड तास लागायचा. मात्र आता हाच 60 किलोमीटरचा रस्ता कापायला अडीच तास लागतात. याला कारण म्हणजे बारब्रिक कंपनीने ठिकठिकाणी रस्त्याची ठेवलेली अर्धवट कामं. तर दुसरीकडे एका बाजूला रस्ता आणि दुसऱ्या बाजूला खड्डा खोदून ठेवल्याने याचा नाहक त्रास रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या लोकांना, मुख्यत: रात्रीच्या वेळी जाणवतो. गेल्या सहा महिन्यात तिरोडा ते गोंदिया या रस्त्यावर चार लोकांचा मृत्यू तर 15 च्या वर लोक गंभीर जखमी झाले. तर गोंदिया ते आमगाव दरम्यान चार जणांचा मृत्यू तर 12 हून अधिक लोक जखमी झाले. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरुन जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.
तर अशीच परिस्थिती गोंदिया शहराला लागून असलेल्या कुडावा भागातील देखील असून या ठिकाणी बारब्रिक कंपनीतर्फे रस्त्याची कामं सुरु आहेत. या ठिकाणीही रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था झाली आहे. याच चौकातून एकीकडे नागपूर रोड जातो तर दुसरीकडे एमआयटी कॉलेजकडे जाणारा मुख्य रस्ता जात असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते.
फंड नसल्याने सुरक्षेसंदर्भातील सूचना फलक नाहीत
या रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांना मुख्य कारण म्हणजे रस्ते बांधकाम करताना कंपनीने सुरक्षेसंदर्भातील सूचना फलक, रिफ्लेकटर किंवा बोर्ड या ठिकाणी लावलेले नाहीत. यासंदर्भात बारब्रिक कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र चौबे यांना विचारलं असता, रस्ते बांधकाम सुरक्षेसाठी कुठलाही अतिरिक्त फंड मिळत नसल्याचं सांगितलं. त्यांनी कॅमरेयासमोर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे आणखी किती लोकांचा बळी घेतल्यावर बारब्रिक कंपनीला जाग येतो हे पाहावं लागेल.