उपमुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न, मला एकनाथ शिंदे यांची काळजी वाटते : सुप्रिया सुळे
Supriya Sule : एखादा मोठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसतो, त्यांना मुद्दामून प्रॉम्प्टिंग करणे, त्यांना चिठ्ठी पाठवणे यातून मुख्यमंत्र्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री करत आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
Supriya Sule on CM Eknath Shinde : "मला महाराष्टाच्या मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते. कारण मला वाटतं की त्यांच्यामागे मोठं षडयंत्र सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुद्दामून प्रॉम्प्टिंग करणे, त्यांना चिठ्ठी पाठवणे यातून मुख्यमंत्र्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री करत आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या. पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागमार्फत महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सेस शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप समारंभ खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप केला.
राज्य मंत्रिमडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक असा प्रकार घडला की ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिठ्ठी दिल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर मुख्यमंत्री काही सेकंदासाठी थांबले, ती चिठ्ठी वाचली आणि पुन्हा बोलू लागले. परंतु यावरुन चर्चांना उधाण आलं. मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन बोलतात का, असाही सवाल केला जात आहे. यावरुनच सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत चिंता व्यक्त करुन उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली.
उपमुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला महाराष्टाच्या मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते. कारण मला वाटतं की त्यांच्यामागे मोठं षडयंत्र सुरु आहे. उपमुख्यमंत्री सातत्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान मी कधीच सहन करणार नाही. एखादा मोठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसतो, त्यांना मुद्दामून प्रॉम्प्टिंग करणे, त्यांना चिठ्ठी पाठवणे यातून मुख्यमंत्र्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री करत आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान
नवीन आलेलं सरकार कन्फ्युज्ड आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी चार अशा गोष्टी दाखवल्या ज्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान होताना किंवा प्रॉम्प्टिंग करताना दिसत आहे. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. मला आठवतंय अनेक आमदार असे होते ते बोलत होते दादांनी फंड दिला नाही, म्हणून आम्ही वेगळा गट करतोय. महाराष्ट्रातील एक स्वाभिमानी महिला म्हणून मला त्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही निधी मिळत नाही, शिवसेने हिंदुत्त्व सोडलं असं सांगत वेगळा गट केला. मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? या राज्याचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो तो राज्याचा मुख्यमंत्री असतो. माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने अपमान करत असेल तर माझा स्वाभिमान जागा आहे आणि जागा राहिली. दिल्लीपुढे हा महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकू देणार नाही. सातत्याने टीव्हीवर दिसतं तर यांना कशा वेदना होत नाहीत. त्यांना छत्रपतींचा नाव घेण्याचा अधिकारच नाही.
एकनाथ शिंदेंची प्रचंड चिंता, त्यांना प्रोटेक्ट करणं गरजेचं
सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या काहीतरी चुका काढतात, त्यांना प्रॉम्प्टिंग केलं जातं. म्हणजे मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नाही की त्यांच्यामागे काहीतरी मोठं षडयंत्र चाललं आहे की मुख्यमंत्री वीक दिसावेत आणि लोकांच्या नजरेतून ते उतरावेत. त्यामुळे मला एकनाथ शिंदे यांची प्रचंड चिंता वाटते. आपण सगळ्यांनी मिळून त्यांना प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे.