Zero Hour : पुणे अपघातानंतर कारवाई, त्रास देण्याचा प्रयत्न; पब-बार मालकांचा आरोप पटतो का?
आठवड्याभरापासून गाजणाऱ्या पुण्यातल्या याच रॅश ड्रायव्हिंग प्रकरणावर आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता.. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जावूया आपल्या मीडिया सेंटरवर...
पुण्यातील ड्रंक आणि रॅश ड्रायव्हिंग अपघाताला आठवडा उलटला.. ज्याच्यामुळे हे सर्व घडलं त्याच्या वडिलांना कोठडी झाली.. आजोबांची, मित्रांची, ड्रायव्हरची चौकशी झाली.. अल्पवयीनची बाल सुधारगृहात रवानगी झाली.. ज्या बारमध्ये दारु प्यायली त्या दोन बारना टाळं लागलं.. केवळ त्या बारलाच नाही तर पुण्यातील इतर ३२ पब-हॉटेल्सना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईची धडक बसली.. १० रुफटॉप, अंदाजे १६ पब, इतर ६ परवानाकक्ष बार सील केले.. ५४ हॉटेल वर गुन्हे नोंद करत, ५ लाखांचा दंडही वसूल केला..
आणि या कारवाईमुळेच आज पुण्यात आंदोलन देखील झालं.. ज्या बारमध्ये अल्पवयीनला दारू देण्यात आली.. त्यावर कारवाई करा.. पण नियम पाळणाऱ्यांवर, लायसन्स असणाऱ्यांवर कारवाई का? असा सवाल कारवाईमुळे त्रस्त पब-बार मालक विचारतायत.. ही कारवाई म्हणजे 'गव्हासोबत खडेही भरडले जातात' अशीच असल्याची टीका त्यांच्याकडून होतेय.. या कारवाईनंतर आज पब आणि बार मालकांची बैठक झाली.. तसंच राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्रही देण्यात आलं..