मुंबई : कोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. राज्यात रोज कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

कोरोना बाधित रुग्णसंख्येचा राज्यात रोज विक्रमी आकडा समोर येत आहे. यात विशेषकरुन मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात  आज 2 लाख 10 हजार सक्रिय रुग्ण असून 85 टक्के लक्षण विरहित आहेत. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 0.4 टक्के इतका आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन/अंमलबजावणी राज्यात होत असल्याचेही टोपे यांनी सांगितले. सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे. 

मुख्यमंत्र्यांसोबत काल बोलणं झालं. जर कोरोना रुग्ण वाढत असतील तर काही शहरात लॉकडाऊन लावावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणण आहे. परिस्थिती बिघडली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल. लॉकडाऊन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली 80 टक्के असेल तर इतर ठिकाणी 200 टक्के असल्याचे टोपेंनी सांगितले. खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुगांसाठी 80 टक्के खाटा ठेवण्यात येतील. डॅश बोर्ड नियमितपणे अपडेट केला जाईल. रुग्णाला उपचार मिळेल याला प्राधान्य असेल.