Ratnagiri : संगमेश्वरमध्ये इमाम अहमद रझा सुन्नी मदरशाकडून चिपळूण शहरातील पूरग्रस्तांना मदत
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील पुरग्रस्तांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदत आली. पण, काही जणांना मदत मिळण्यास थोडीफार अडचण देखील झाली. दरम्यान, हीच गोष्ट लक्षात घेत 'कूपन्स घ्या जीवनावश्यक, संसारोपयोगी वस्तू न्या' अशी अनोखी सेवा संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे गावच्या दारूल उलुम इमाम अहमद रझा या सुन्नी मदरशाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. पूरग्रस्तांची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर संबंधितांना कूपन्स दिले जाते. त्यानंतर त्यांना गाडीच्या माध्यमातून मोफत दर्ग्यात आणले जाते. या ठिकाणी आलेला पूरग्रस्त आपल्याला हवी असलेली कोणतीही वस्तू, अन्नधान्य मोफत घेऊ शकतो. त्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या घरी सोडले जाते. जवळपास 100 पेक्षा देखील जास्त वस्तू, अन्नधान्य, संसारोपयोगी सामान या ठिकाणी आहे. पूरभागातील स्थिती पूर्णपणे सुरळीत होत नाही तोवर 24 तास सर्व धर्मियांसाठी ही सेवा सुरू राहणार आहे.