Mumbai Cruise Drug Case : किरण गोसावी एक सराईत गुन्हेगार? किरण गोसावी आणि एनसीबीचा काय संबंध?
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या विरुद्ध केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे एनसीबी (NCB) अधिकाऱ्यांच्या अडचणीत निश्चित वाढ झाली आहे. आता या प्रकरणात ज्या किरण गोसावीला एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे, तो गोसावी एक सराईत गुन्हेगार असल्याचा खुलासा होत आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या माहितीनुसार किरण गोसावी विरुद्ध एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.
यामध्ये लोकांची फसवणूक करुन लाखो रुपये घेणे, धमकी देण्यासारखे गुन्हे आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे तर एकामध्ये तो अद्यापही फरार असल्याचं रेकॉर्डवर आहे. म्हणून इथे प्रश्न उपस्थित होतो की एक फरार आरोपी इतक्या मोठ्या केसमध्ये एनसीबीचा प्रमुख साक्षीदार कसा होऊ शकतो? एक फरार आरोपी इतक्या मोठ्या केसमध्ये आर्यन खान सारख्या हाय प्रोफाईल आरोपीला आपल्या ताब्यात घेऊन कसा जाऊ शकतो?