मतचोरीबाबत ट्विट, CSDS च्या संजय कुमारांविरुद्ध नागपूर, नाशिकमध्ये गुन्हा दाखल; तहसिलदारांनीच दिली तक्रार
लोकसभा 2024 आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघाबाबत संजय कुमार यांनी चुकीची सोशल मीडियावरुन शेअर केली होती.

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी मतदार याद्यांचा घोळ असल्याचे सांगत काही पुरावेही पत्रकार परिषदेतून दिले होते. त्यानंतर, देशभरात मतचोरीचा (Voting) आरोप केला जात असून निवडणूक आयोगानेही यावर पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. यासंदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. "सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीस" म्हणजे सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशनमध्ये "सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीस" म्हणजे सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रामटेक तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. तर, नाशिकमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.
लोकसभा 2024 आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघाबाबत संजय कुमार यांनी चुकीची सोशल मीडियावरुन शेअर केली होती. तर, रामटेक विधानसभा मतदारसंघातील निकालावरही त्यांनी अशाचप्रकारे भाष्य केलं होतं. संजय कुमार यांच्या या सोशल मिडिया पोस्टनंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता, तर काही विरोधी पक्षातील नेत्यांनी याच पोस्टचा आधार घेत सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती. सीएसडीएसने सोशल मीडियावर महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत रामटेक येथील उदाहरणही दिले होते. रामटेकमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कमी करण्यात आल्याचा दावा सीएसडीएसकडून सोशल मीडियावर करण्यात आला होता. सीएसडीएसचा तो दावा खोटा असून नागरिक आणि मतदारांची दिशाभूल करणारा आहे, अशा आशयाची तक्रार रामटेकच्या तहसीलदारांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्यासंदर्भात गुन्ह्याची नोंद केली आहे.
नागपूर आणि नाशिकमध्ये गुन्हा दाखल
संजय कुमार यांच्याविरोधात नाशिकमधेही गुन्हा दाखल केला जात आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वोटचोरीचा चुकीचा आरोप केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला जात असून निवडणूक आयोगाकडून पोलीसांकडे तक्रार देण्यात आली आहे. तर, यापूर्वी नागपूरमध्येही त्यांच्यावर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
काय होते संजय कुमार यांचं ट्विट
संजय कुमार यांनी 17 ऑगस्ट रोजी एक ट्विट केले होते. त्यामध्ये, नाशिक पश्चिम मतदारसंघात 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 328,053 मतदार होते. तर, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा हाच आकडा 483,459 पर्यंत वाढला. म्हणजेच मतदारांची संख्या एकूण 47.38 टक्क्यांनी वाढली. हिंगणा मतदारसंघातही मतदार 314,605 हून 450,414 एवढे झाले. ही वाढ 43.08 टक्के आहे, असे संजय कुमार यांनी सोशल मीडियातून म्हटले होते. मात्र, वाद झाल्यानंतर त्यांनी आपले हे ट्विट डिलिट देखील केले आहे.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर पलटवार केला होता. तसेच, सर्व आरोप फेटाळत निवडणूक आयोग हा कुठल्याही पक्षाचा नसून सर्वांसाठी समकक्ष असल्याचेही म्हटले होते. तर, मतदार यादीतील घोळावर भाष्य करताना, अनेक मतदार ओळखपत्रे असलेल्या व्यक्तीची प्रकरणे सहसा स्थलांतर किंवा प्रशासकीय चुकांमुळे उद्भवतात आणि निवडणूक अधिकारी या चुका दुरुस्त करण्यासाठी काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले होते. ज्या घरांच्या मतदार यादीत 0 हा आकडा आहे, त्या घरांना मतदार यादीत घर नसल्याने किंवा त्यांना घर क्रमांक दिलेले नसल्यामुळे असे घर दिले जात नाही. “एखाद्या व्यक्तीला दोन ठिकाणी मते असली तरी तो फक्त एकाच ठिकाणी मतदान करण्यासाठी जातो. दोन ठिकाणी मतदान करणे हा गुन्हा आहे आणि जर कोणी दुहेरी मतदानाचा दावा केला तर पुरावे आवश्यक आहेत. पुरावे मागितले गेले पण दिले गेले नाहीत,” असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा
जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; कारवाई होणार, सीईओंचे आदेश
























