Lakhimpur Kheri प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, उद्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सुनावणी
Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचे टायटल Violence in Lakhimpur Kheri leading to loss of life असे ठेवले गेले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली हेही खंडपीठाचे सदस्य आहेत.
लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषसह अनेक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वास्तविक, अजय मिश्रा यांच्या मूळ गावी दंगलचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.
शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचे आयोजन केले होते. शेतकरी संघटनांचा आरोप आहे की, जेव्हा शेतकरी तिकोनिया परिसरात आंदोलन करत होते, तेव्हा अजय मिश्रा यांच्या मुलाची गाडी शेतकऱ्यांना चिरडत पुढे गेली. यानंतर हिंसाचार भडकला. या संपूर्ण प्रकरणात चार शेतकऱ्यांसह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला.
उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की पोलीस आरोपींना अटक न करता त्यांचे संरक्षण करत आहेत. त्यांची मागणी आहे की, पीएम मोदींनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना हटवावे.