Special Report: कोरोनाग्रस्तांना शिक्षक देतोय रिक्षातून मोफत सेवा;घाटकोपरच्या शिक्षकाचा अनोखा उपक्रम
मुंबई : एकीकडे लॉकडाऊनमध्ये सर्वसामन्यांचा रोजगार गेल्यामुळे नागरिक हैराण आहेत. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही सामान्य नागरिक आपापल्या पद्धतीने गरजूंना मदतीचा हात देत आहेत. मुंबई उपनगरातील घाटकोपरमधील एक शिक्षक सध्या कोरोनाग्रस्तांसाठी अनोखी मदत करत आहे.
दत्तात्रत सावंत खरंतर पेशाने शिक्षक, इंग्रजी शिकवतात. मात्र विनाअनुदानित शाळेत शिकवत असल्याने आणि सध्या लॉकडाऊन लागल्याने ते आता रिक्षा चालवतात. मात्र हे काम करतानाही त्यांनी अनोखं मदतकार्य सुरु केलं आहे. ते सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांना कोविड सेंटर तसंच रुग्णालयापर्यंत मोफत सोडत आहेत. याशिवाय रुग्णालय, कोविड सेंटरमधून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना मोफत घरी सोडून येत आहेत. यासाठी ते स्वतः सुरक्षेचे सगळे उपाय देखील करत आहेत.
सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही. यात अनेकांचे वेळेत उपचार न मिळाल्याने जीव देखील जात आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना वेळेत मदत मिळेल की नाही याची खात्री नसते. खाजगी रुग्णवाहिका परवडत नाही आणि अनेकदा सार्वजनिक वाहने कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देत नाहीत. अशा वेळी दत्तात्रय सावंत हे मात्र या रुग्णांच्या लोकांच्या मदतीला धावून जात असून त्यांना मोफत सेवा देत आहेत.
कोरोना महामारीच्या या कठीण काळात दत्तात्रय सावंत हे शिक्षक आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपताना दिसत आहेत. त्यांचा आदर्श खरंच समाजाने घेणं गरजेचं आहे.