Driving Tips : ड्रायव्हिंग करताना रस्त्यावरचे वाद कसे टाळाल? 'या' 12 टिप्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या
Driving Tips : बेशिस्त ड्रायव्हिंगमुळे रोड रेज अर्थात गाडी चालवण्यावरून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे.
Driving Tips : भारतात बेशिस्त ड्रायव्हिंगमुळे रोड रेज अर्थात गाडी चालवण्यावरून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे. आपल्याला मात्र गुन्हा करायचा नाहीये. पण राग तर येतो. मग राडे टाळायचे कसे? पुढे वाचत राहा!
1. स्वतःचा जीव गमावू नका
समजा हाणामारी वाढत गेली, आणि समोरच्यानं डोक्यात दगड किंवा रॉड घातला, आणि मृत्यू झाला. मग तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांनी काय करायचं? वृद्ध आई-वडिलांनी कुणाच्या आधारानं जगायचं? त्यातही जर तुमची आर्थिक स्थिती बेताची असेल तर कुटुंब उघड्यावर येईल हे विसरू नका.
2. कुटुंबाचा विचार करा
रागाच्या भरात गुन्हा करून बसलात तर जेलमध्ये जावं लागेल. मग तुमच्या कुटुंबीयांचं काय? त्यांना पुढचे अनेक वर्ष जेल आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील. ते चालेल तुम्हाला? नाही ना? म्हणून अहंकार आड येऊ न देता घटनास्थळावरून निघा.
3. करिअरवर परिणाम होईल!
तुमच्यावर पोलीस केस झाली तर असलेली नोकरी जाऊ शकते, आणि नवी नोकरी मिळणं देखील महाकठीण होईल. आजच्या काळात प्रत्येक कंपनी 'बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन' करतेच. त्यात जर गंभीर गुन्ह्याची केस आढळली तर करिअर संपू देखील शकतं हे लक्षात घ्या.
4. गाडीतून उतरू नका
समोरची व्यक्ती हल्ला करण्याच्या तयारीत असेल तर गाडीतून उतरू नका. अशा वेळी गाडीसारखं दुसरं कवच नाही, हे लक्षात ठेवा.
5. पोलिसांना फोन करा
अपघात, वाद, राडे असा स्थितीत काय करायचं याबाबत पोलिसांना प्रशिक्षण असतं आणि अनुभवही. त्यामुळे हीरो बनायला जाऊ नका. पोलिसांना फोन करा आणि पुढची कृती त्यांना करू द्या.
6. कुठलाही कमीपणा नाही
मी उत्तर नाही दिलं तर आजूबाजूचे काय म्हणतील? असा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. पण त्या अनोळखी लोकांसाठी तुमच्या जीवाभावाच्या व्यक्तींना अडचणीत आणू नका.
7. काहींना राडे करण्याची हौस
रस्त्यावर काहींना हाणामाऱ्या करण्याची खुमखुमी असते. त्यांच्या जाळ्यात फसू नका. तुमची चूक नसून सुद्धा माफी मागितलीत तर काहीही फरक पडत नाही.
8. 'डिफेन्सिव्ह' ड्रायव्हिंग शिका
गाडी चालवताना आपली भूमिका बचावात्मक हवी. दुसऱ्याच्या चुकीपासून किंवा चिथावणीपासून स्वतःचा बचाव करा, त्याला साथ देऊन प्रकरण वाढवू नका. जगभरात ड्रायव्हिंग स्कूलमध्ये 'डिफेन्सिव्ह' ड्रायव्हिंगच शिकवतात.
9. न्याय करायला जाऊ नका
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना शासन करण्याचं काम पोलिसांचं आहे, तुमचं नाही, हे स्वतःला सांगत राहा. आपण कुठेतरी पोहोचण्यासाठी प्रवास करतो, लोकांना अद्दल घडवायला नाही.
10. चूक मान्य करा
तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती मान्य करा, माफी मागा. एक तर तसं करणं अपेक्षित आहे, आणि दुसरं म्हणजे त्यानं वातावरण शांत होण्यास मदत होते.
11. वाटल्यास ब्रेक घ्या
कुणाशी वाद झाला तर काही अंतरावर जाऊन गाडी थांबवा, चहा किंवा कॉफी घ्या.. किंवा मित्राला फोन करा. काहीही करून घडलेल्या घटनेवरून लक्ष हटवा, कारण विचार करून घडलेली गोष्ट बदलणार नाही.
12. कर्कश संगीत टाळा
गाडीत जेवढ्या मोठ्यानं गाणी लावाल, तेवढं मन लवकर व्यथित होतं, राग लवकर येतो. त्यामुळे हळू आवाजात गाणी लावा.