World Cup 2023 : श्रीलंकेचं स्वप्न भंगले, विश्वचषकात थेट 'नो एन्ट्री'
World Cup 2023 : भारतामध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात थेट प्रवेश मिळण्याचे श्रीलंकेचं स्वप्न भंगले आहे.
World Cup 2023 : भारतामध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात (ICC Cricket World Cup 2023) थेट प्रवेश मिळण्याचे श्रीलंकेचं स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडविरोधातील मानहानीकारक पराभव झाल्यानंतर श्रीलंका विश्वचषकात थेट प्रवेश मिळण्यापासून वंचित राहिली आहे.
न्यूझीलंड आणि श्रीलंका (New Zealand vs Sri Lanka) यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका पार पडली. अखेरच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने (NZ vs SL 3rd ODI) श्रीलंकेचा पराभव केला. यासह तीन सामन्याची मालिका 2-0 च्या फराकाने जिंकली. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. या मालिकेत 2-0 ने पराभव झाल्यामुळे श्रीलंकेचे विश्वचषकात थेट क्वालिफाय होण्याचं स्वप्न भंगले आहे. 81 गुणांसह श्रीलंका नवव्या स्थानावर आहे. तर 88 गुणांसह वेस्ट इंडिज आठव्या क्रमांकावर आहे. भारत, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगानिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी विश्वचषकात थेट क्वालिफाय केलेय. आता उर्वरित एका स्थानासाठी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि आयरलँड यांच्यात लढत आहे.
शुक्रवारी हेमिल्टनमध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाची सुरुवात अतिशय खराब झाली... 20 धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले. श्रीलंकेचा अर्धा संघ अवघ्या 70 धावात तंबूत परतला होता. पथुम निसांकाने एका बाजूने धावा केल्या.. त्याने श्रीलंकेचा डाव सांभाळत स्वत:चे अर्धशतक पूर्ण केले. निसांका 57 धावा काढून तंबूत परतला. अखेरीस दसुन शानाका आणि चमिका करुणारत्ने यांनी संघाची धावसंख्या 150 च्या पार नेली. न्यूझीलंडकडून हेनरी, शिपली आणि डेरिल मिचेल यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
श्रीलंकेने दिलेले 158 धावांचे आव्हान पार करताना न्यूझीलंडची सुरुवातही खराब झाली. दुसऱ्याच षटकात चाड वोज आणि टॉम ब्लंडेल यांना लहीरू कुमाराने तंबूत धाडले. त्यानंतर कसुन रजिताने डेरिल मिचेल आणि टॉम लॅथनला दसुन शनाकाने बाद करत श्रीलंकेच्या विजयाच्या आशा उंचावल्या. पण त्यानंतर विल यंग याने डावाची सुत्रे हातात घेतली. विल यंग याने हेनरी निकल्स याच्यासोबत न्यूझीलंडचा डाव सावरला. यंग याने अर्धशतकी खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
श्रीलंका विश्वचषकातून बाहेर?
वर्ल्डकप 2023 मध्ये दहा संघ खेळणार आहेत. आतापर्यंत सात संघाने क्वालिफाय केलेय. वर्ल्ड कप 2023 साठी सुपर लीग अंतर्गत गुणतालिकेतील आघाडीचे आठ संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. श्रीलंका संघ सध्या नवव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ते थेट प्रवेशाला मुकले आहेत. भारत, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगानिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी विश्वचषकात थेट क्वालिफाय केलेय. श्रीलंका संघाला विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला नाही, पण त्यांच्याकडे अद्याप संधी आहे. श्रीलंका संघाला आता क्वालिफाय सामने खेळावे लागणार आहेत. जून 2023 मध्ये दोन जागांसाठी लढत होणार आहे. तर सध्या आठव्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका, आयरलँड आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत होणार आहे. यातील एका संघाला थेट प्रवेश मिळणार आहे. तर उर्वरित संघाला क्वालिफाय करावे लागणार आहे.