IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका, स्टार फलंदाजाला दुखापत
Shan Masood Injured : टी-20 वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज शान मसूद (Shan Masood) याला दुखापत झाली आहे.
T20 World Cup 2022 : आयसीसी टी20 (ICC T20 World Cup 2022) विश्वचषकाला सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या महत्त्वाच्या आणि मोठ्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज शान मसूद (Shan Masood) याला दुखापत झाली आहे. पाकिस्तानच्या नेट सरावादरम्यान त्यांचा स्टार फलंदाज शान मसूद जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पाकिस्तानचा स्टार फलंदाजशान मसूदला दुखापत
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सराव सत्रादरम्यान मोहम्मद नवाजचा चेंडू शान मसूदच्या डोक्याला लागला, त्यानंतर तो काही वेळ तिथेच बसून राहिला. त्याची दुखापत पाहून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता तपासानंतर शान मसूदची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अधिक माहिती समोर येईल.
शान मसूद पाकिस्तानसाठी मधल्या फळीतील फलंदाज आहे. पाकिस्तान संघ गेल्या काही काळापासून आपल्या मधल्या फळीच्या समस्येला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत मसूदची दुखापत गंभीर असेल तर त्याला भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर बसावं लागू शकतं.
JUST IN: Shan Masood has been taken to the hospital for scans
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 21, 2022
A ball hit him on the right side of his head during Pakistan's net session at the MCG pic.twitter.com/lweJUfyLz3
पंतच्या जागी कार्तिकला मिळू शकते संधी
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकचा संघात समावेश करू शकते. अलीकडे ऋषभ पंतचा फॉर्म खूपच खराब आहे, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामन्यात 9-9 धावांची इनिंग खेळली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही त्याला स्थान मिळालं नाही. या सामन्यात ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आणि कार्तिकने या सामन्यात 10 चेंडूत 20 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतच्या जागी कार्तिकला संधी मिळू शकते.
भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा कार्तिकला संघाचा फिनिशर म्हणून उत्तम पर्याय मानतात. खराब फॉर्ममुळे ऋषभ पंत संघाच्या विश्वासावर टिकू शकला नाही. यामुळे ऋषभला पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं जाऊ शकते. असं झाल्यास पंतच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. त्याचवेळी, कार्तिकच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असेल.