T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अखेरच्या दिवसापर्यंत पाऊस करणार बॅटिंग, अनेक सामने रद्द होण्याची शक्यता
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पावसाची खेळी शुक्रवारीही कायम राहिली. दिवसभर पडत राहिलेल्या पावसामुळं मैदान खेळण्याजोगं न राहिल्यानं शुक्रवारी खेळले जाणारे दोन्ही सामने एकही चेंडू न खेळवता रद्द करण्यात आले.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पावसाची खेळी शुक्रवारीही कायम राहिली. दिवसभर पडत राहिलेल्या पावसामुळं (Australia Rains) मैदान खेळण्याजोगं न राहिल्यानं शुक्रवारी खेळले जाणारे दोन्ही सामने एकही चेंडू न खेळवता रद्द करण्यात आले. पावसामुळं आतापर्यंत चार सामन्यांचा निकाल लागलेला नाही. मात्र, यापुढंही पाऊस अनेक सामन्यात हजेरी लावण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ऑस्ट्रेलियात येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडेल. नोव्हेंबरच्या संपूर्ण महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळं टी-20 विश्वचषकातील अनेक सामन्यांवर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
पावसामुळं मोठ्या संघाचं नुकसान
या स्पर्धेत सामना जिंकणाऱ्या संघाच्या खात्यात दोन गुण जमा होतात. पंरतु, सामना रद्द झाल्यात हे गुण दोन्ही संघात विभागून दिले जातात. म्हणजेच दोन्ही संघाला प्रत्येकी एक-एक गुण मिळतात. सामना रद्द झाल्यानं छोट्या संघावर अधिक परिणाम होणार नाही. परंतु, मोठ्या संघासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे बंद होऊ शकतात.
गट 'अ' मधील तीन सामने रद्द
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील गट 'अ' मधील तीन सामने पावसामुळं अनिर्णित ठरली. न्यूझीलंड-अफगाणिस्तान, आयर्लंड-अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आले. तर, इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यातही पावसानं हजेरी लावली. त्यामुळं हा सामना डकवर्थ लुईस नियमांतर्गत आयर्लंडच्या झोळीत टाकण्यात आला. या सामन्यात इंग्लंडचा पाच धावांनी पराभव झाला. ग्रुप 'ब' मधील दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यालाही पावसानं खोडा लावला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर होता.
न्यूझीलंड- श्रीलंका यांच्यात आज रंगणार सामना
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आज सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 1.30 वा. सुरू होणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना पार पडणार आहे. सुपर 12 फेरीत दोन्ही संघानं प्रत्येकी दोन-दोन सामने खेळले आहेत. परंतु, एका सामन्यात श्रीलंकेच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. तर, एका सामन्यात विजय मिळवलेल्या न्यूझीलंडचा दुसरा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. न्यूझीलंडचा संघ 3 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर, दोन गुणांसह श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानावर आहे.
हे देखील वाचा-