...तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेऊ; सोलापुरात शरद पवारांच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य
महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून मिशन सोलापूर महापालिका सुरू झाले आहे.

सोलापूर : राज्यातील बहुतांश नगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं, तब्बल 120 हून अधिक नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्षही बनले आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा खासदार धैर्यशील मोहिते (Dhairysheel mohite patil) पाटील यांनी अकलूज नगरपालिका जिंकल्यावर धुरंदर स्टाईल आनंद साजरा केला होता. 'घायल हू इसलिये घातक हूँ' असे म्हणत धुरंदर चित्रपटातल्या गाजलेल्या डायलॉगने भाजपवर निशाणा साधला होता. आता, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानेही पक्षाने त्यांच्यावर निवडणुकाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर, प्रथमच त्यांनी सोलापुरात (Solapur) अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडीबाबत भाष्य केलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याने राज्यभर शरद पवार-अजित पवारांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून मिशन सोलापूर महापालिका सुरू झाले आहे. सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असून त्या संदर्भात चर्चा सुरू झाल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. सोलापूर महापालिकेसाठी जर अजित पवार यांच्या पक्षाकडून प्रस्ताव आल्यास त्यांनाही आघाडीत सामील करून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वरिष्ठांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अजितदादा पवारांच्यासोबत जाण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेऊ
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता सोलापूर महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सोलापूर शहरात देखील मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे बेरजेचे राजकारण करण्यासाठी मोहिते पाटील अकलूज पॅटर्न सोलापूर महापालिकेत राबवण्याचा प्रयत्न करतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तसा प्लॅन आखला जात आहे. त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाशी चर्चा सुरू केली आहे. यात जर अजित पवारांच्या पक्षाकडूनही आघाडीचा प्रस्ताव आल्यास भाजपला रोखण्यासाठी त्यांनाही आघाडीत सोबत घेऊन सोलापुरात भाजपविरुद्ध आघाडी केली जाईल, असेही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत




















