T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मिळाला दुसरा धोनी, सुरेश रैनानं केलं 'या' खेळाडूचं कौतुक
Suresh Raina on Team india : टी20 विश्वचषकाला आता सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध असणार आहे.
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये टी20 वर्ल्डकप 2022 (T20 World Cup) स्पर्धेला सुरुवात झाली असून क्वॉलीफायर सामन्यांच्या पहिल्याच सामन्यात नामिबियाने श्रीलंका संघाला मात दिली आह. दुसरीकडे भारतीय संघ मात्र आपला सलामीचा सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळणार आहे. या सामन्यापूर्वीच माजी खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) भारतीय संघाला दुसरा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मिळाला आहे असं म्हणत संघातील एका खेळाडूचं कौतुक केलं आहे.
रैनाने हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) रुपात धोनी दिसत असल्याचं म्हटलं आहे. टाईम्स नाऊशी बोलताना रैना म्हणाला, “संघात सध्या हार्दिक पांड्याचा रोल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्याची कला त्याच्याकडे असल्याने त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. याशिवाय हार्दिकने महेंद्र सिंह धोनीप्रमाणे फलंदाजी शिकल्याने वर्ल्डकपमध्ये फिनिशरच्या रुपात आता तो दिसणार आहे.”
रोहितसह विराट, सूर्याचंही कौतुक
पुढे बोलताना रैना म्हणाला, “यावेळच्या T20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाकडून मला बऱ्याच आशा आहेत. टी-20 विश्वचषकाचे कर्णधारपद भूषवण्यासाठी रोहित शर्मा योग्य कर्णधार आहे. यावेळच्या T20 विश्वचषकात मी विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीबद्दल खूप उत्सुक आहे. दोघेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत. दोघेही गेमचेंजर्स ठरू शकतात.
'पाकिस्तानवर भारताचा विजय असतील दिवाळीचे फटाके'
दिवाळीच्या एक दिवस आधी विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. अशामध्ये टीम इंडियाचा विजय भारतीयांसाठी दिवाळीच्या फटाक्यांप्रमाणे असणार आहे. असं विधान करत रैना म्हणाला,"या सामन्यात उर्वरित सामन्यांच्या तुलनेत एक वेगळीच लढत पाहायला मिळते. अंडर प्रेशर हा सामना असतो. मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो आहे, मला प्रेशर चांगलच माहित आहे. मागील टी20 विश्वचषकात भारत पाकिस्तानकडून पराभूत झाला होता, पण यंदा पाकिस्तानवर भारताचा विजय भारतीयांसाठी दिवाळीचे फटाके असणार आहेत.
विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
हे देखील वाचा-