Sourav Ganguly: सौरव गांगुलींना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवण्याबाबत कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल
BCCI President: वकील रामप्रसाद सरकार यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
BCCI President: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) जागी अलीकडेच भारताच्या 1983च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेले रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नवीन अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. मात्र, सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवण्याबाबत कोलकाता उच्च न्यायालयात (Calcutta High Court) याचिका दाखल करण्यात आलीय. वकील रामप्रसाद सरकार यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सौरव गांगुली हे आणखी तीन वर्ष बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर राहू शकतात, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट आदेश दिला होता. मात्र, तरीही सौरव गांगुलींना बीसीसीआयच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आलं, असा युक्तिवाद सरकार यांनी केला. "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जय शाह यांना 2025 पर्यंत आणखी तीन वर्षे बीसीसीआय सचिवपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला. महत्वाचं म्हणजे, जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी कायम असूनही गांगुली यांना हटवण्यात आलं.
सौरव गांगुलींना अध्यक्षपदावरून हटवण्यामागं षडयंत्र
"भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल संघाचा माजी खेळाडू असल्याने गांगुली हा बंगालचा अभिमान आहे. हा राज्याचा अपमान आहे. त्यांना हटवण्यामागं नक्कीच काहीतरी राजकीय षडयंत्र आहे", असंही सरकार यांनी म्हटलंय.
बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सौरव गांगुलींची प्रतिक्रिया
बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षाबाबत शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली म्हणाले होते की, प्रशासक म्हणून त्यांनी दीर्घ खेळी खेळली असून आता त्यांचं लक्ष मोठं काही करण्यावर आहे. "मी बराच काळ प्रशासक राहिलो आहे. पण आता मी माझ्या आयुष्यात पुढे जातोय. मी टीम इंडियासाठी 15 वर्षे खेळलो, हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असेल. मी बीसीसीआयचा अध्यक्षही होतो. आता माझं लक्ष काहीतरी मोठं करण्यावर आहे."
सीएबी अध्यपदाच्या निवडणुकीतून अखेरच्या क्षणी माघार
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर गांगुलीने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष होण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतली. या पदासाठी त्यांनी आपला मोठा भाऊ स्नेहसिस गांगुली यांना पाठिंबा दिला, जो जो बंगाल संघाचा माजी खेळाडू होता.
हे देखील वाचा-