(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs SL: समान गुण, एकसारखेच विजय, मग इंग्लंडला सेमीफायनलचं तिकीट आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर का?
T20 World Cup 2022: सिडनी येथे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात (England vs Sri Lanka) टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 39वा सामना पार पडलाय.
T20 World Cup 2022: सिडनी येथे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात (England vs Sri Lanka) टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 39वा सामना पार पडलाय. या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेवर चार विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडनं सेमीफायनमध्ये धडक दिली. तर, श्रीलंकेच्या पराभवासह ऑस्ट्रेलियाच्या उरल्या सुरलेल्या आशाही संपुष्टात आल्या. महत्वाचं म्हणजे, समान गुण आणि समान सामने जिंकलेले असतानाही इंग्लंडच्या संघाला सेमीफायनलचं तिकीट आणि ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ स्पर्धेबाहेर का? यामागचं समीकरण जाणून घेऊयात.
टी-20 विश्वचषकाच्या 'अ' गटात न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि अफगाणिस्तानचा समावेश करण्यात आला होता. या गटातून न्यूझीलंडच्या संघानं सर्वात प्रथम सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. तर, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि श्रीलंकेचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर झाले. दुसऱ्या स्थानासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रस्सीखेच सुरू होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची यांची गुणांची संख्या एकसारखीच आहे. दोन्ही संघानं पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, दोन्ही संघाचा एक-एक सामना रद्द झालाय. ज्यामुळं त्यांच्या गुणांची संख्या सात-सात इतकी आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाचा (-0.173) रनरेट इंग्लंडच्या (+0.473) तुलनेत खराब आहे. यामुळं ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलचं तिकीट मिळणार की नाही, हे श्रीलंकेच्या कामगिरीवर अवलंबून होतं. जर आजचा सामना श्रीलंकेनं जिंकला असता तर, इंग्लंडचे पाचच गुण राहिले असते आणि ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनल गाठण्याचा मार्ग मोकळा झाला असता. पण इंग्लंडनं श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आणलं आहे.
सुपर 12 फेरीतील 'ब' गटाची स्थिती काय?
सुपर 12 फेरीतच्या ब गटातील अखेरचे तिन्ही सामने उद्या खेळवले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकालविरुद्ध नेदरलँड्स, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आणि अखेरचा सामना भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळवला जाणार आहे. दरम्यान 'ब' गटामधील संभ्रम अद्याप कायम आहे. असं असलं तरी सध्या दुसऱ्या गटामधून भारत आणि दक्षिण आफ्रिकाचं उपांत्यफेरीमध्ये प्रवेश करतील असं चित्र दिसत आहे. भारताकडं सध्या सहा गुण आहेत. शेवटचा सामना जिंकून ते आठ गुणांसहीत अव्वल स्थान कायम राखू शकतात. तर दक्षिण आफ्रिकेकडे चार सामन्यांमध्ये पाच गुण आहेत. नेदरलँड्सविरुद्ध उद्याचा सामना जिंकल्या दक्षिण आफ्रिकेचं सात गुण होतील. आयसीसीनं या स्पर्धेतील सुपर 12 फेरीमधील सामन्यांसाठी एकही राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळेच भारत आणि झिम्बाब्वेदरम्यानच्या सामन्याच्या दिवशी पाऊस झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण वाटून दिला जाईल. म्हणजेच भारताकडे सात गुण होतील आणि भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
हे देखील वाचा-