FIFA World Cup 2022 : तब्बल 4 वेळा जिंकलाय विश्वचषक, पण यंदा साधं क्वॉलीफायही करता आलं नाही, इटलीसह हे दिग्गज संघ फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत नसणार
FIFA WC 2022 : फुटबॉल विश्वचष अर्थात फिफा वर्ल्डकप 2022 यंदा कतारमध्ये खेळवला जात असून 32 देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
FIFA World Cup 2022 : जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाचा विश्वचषक यंदा कतार (Qatar) येथे पार पडत आहे. दरम्यान कतारमध्ये होणार्या या फिफा वर्ल्डकपला (FIFA WC 2022) 20 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजता यजमान कतार आणि इक्वेडोर (Qatar vs Ecuador) यांच्यातील सामन्याने या सुरुवात होईल. या विश्वचषकात एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. पण विशेष गोष्ट म्हणजे या भव्य स्पर्धेत काही दिग्गज संघ यंदा पात्रता मिळवू शकलेले नाही. यामध्ये तब्बल 4 वेळा फिफा वर्ल्डकप जिंकणारा आणि युरो कप विजेता इटलीचा फुटबॉल संघ (Italy Football Team) सहभागी होणार नाही. इटलीचा संघ यंदा विश्वचषकासाठी पात्रता मिळवू शकलेला नाही. इटलीसह अजूनही चार दिग्गज संघ आहेत, जे यंदाच्या स्पर्धेत दिसणार नाहीत.
इटली
ब्राझीलनंतर सर्वाधिक फुटबॉल विश्वचषक जिंकणारा इटली हा दुसरा संघ आहे. इटली चार वेळा विश्वविजेता ठरला आहे. फिफा क्रमवारीत तो सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्यात मागीलवर्षी युरो कपही इटलीने उंचावला. पण यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच अगदी थोडक्यात इटलीला पात्रता मिळवता आली नाही. मार्चमध्ये प्लेऑफच्या उपांत्य फेरीत उत्तर मॅसेडोनियाकडून 92 व्या मिनिटाला झालेल्या पराभवानंतर इटली विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला.
चिली
दक्षिण अमेरिकेतील चिली हा संघ आत्तापर्यंत प्रत्येक विश्वचषकाचा भाग राहिला आहे. 1962 मध्ये हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. सध्या या संघाचे रँकिंग 29 आहे. कतार विश्वचषक स्पर्धेतील शेवटच्या चार पात्रता सामन्यांमध्ये फक्त एक सामना चिलिला जिंकता आला. याच कारणामुळे या संघाला पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत खेळता येणार नाही.
कोलंबिया
फिफा क्रमवारीत कोलंबियाचा संघ 17 व्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये झालेल्या 2014 च्या विश्वचषक स्पर्धेत हा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. संघाचा स्टार खेळाडू जेम्स रॉड्रिग्ज विश्वचषक गोल्डन बूट विजेता ठरला आहे. पण यावेळी जेम्स आपल्या संघाला विश्वचषकासाठी पात्र करु शकला नाही. या संघाची पात्रता अवघ्या एका गुणाने हुकली.
स्वीडन
आतापर्यंत 21 पैकी 12 विश्वचषक खेळणारा स्वीडनचा संघ 1958 च्या विश्वचषकात उपविजेता देखील ठरला आहे. गेल्या वर्षी कतार विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात स्वीडनने 6 पैकी 3 सामने गमावले होते. यामुळे संघाला गटात दुसरे स्थान मिळाले आहे. प्लेऑफमध्ये पोलंडकडून पराभूत झाल्याने स्वीडनचे कतार विश्वचषकात पोहोचण्याचे स्वप्न संपुष्टात आले. स्वीडनचे सध्याचे रँकिंग 25 आहे.
नायजेरिया
आफ्रिकन संघ नायजेरिया आपल्या वेगवान खेळासाठी ओळखला जातो. नायजेरियाने 1994 मध्ये पहिला विश्वचषक खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत या संघाने 2006 सोडता इतर विश्वचषकात सहभाग घेतला होता. जिंकला होता. नायजेरियाने आतापर्यंत तीन वेळा सुपर 16 फेरीत प्रवेश केला आहे. संघाचे फिफा रँकिंग 32 आहे. कतारमध्ये मोठ्या संख्येने नायजेरियन काम करतात. अशा परिस्थितीत यंदाच नायजेरियाचा संघ स्पर्धेत नसल्याने चाहते निराश झाले आहेत.
हे देखील वाचा-