T20 World Cup 2022 : भारतीय संघात कार्तिक-पंत दोघांना जागा मिळायला हवं, चेतेश्वर पुजारानं सांगितलं कारण
Dinesh Karthik Rishabh Pant T20 World Cup : चेतेश्वर पुजारा याच्या मते आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघात ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना स्थान मिळायलं हवं, असं त्याने म्हटलं आहे.
Dinesh Karthik Rishabh Pant Team India T20 World Cup 2022 : भारतीय क्रिकेट संघाचं आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत स्पर्धेत खास कामगिरी करु न शकल्याने बाहेर पडला आहे. दरम्यान आता आगामी टी20 विश्वचषकात भारतीय संघ नेमकी कशी कामगिरी करेल? असा प्रश्न फॅन्सना पडला असून कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळेल, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. अशामध्ये यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोघांनाही अंतिम 11 मध्ये संधी मिळावी असं मत भारतीय खेळाडू चेतेश्वर पुजाराने नोंदवलं आहे.
पुजारा म्हणाला, ‘माझ्या मते 5, 6 आणि 7 व्या क्रमांकासाठी मजबूत फलंदाजांची गरज आहे. मला पाचव्या क्रमांकासाठी ऋषभ पंत, सहाव्या क्रमांकासाठी हार्दिक पंड्या आणि सातव्या क्रमांकासाठी दिनेश कार्तिकला खेळताना पाहायला आवडेल. पंत आणि कार्तिक या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवावे, असं माझं मत आहे. गोलंदाजीच्या बाबतीत दीपक हुडाला स्थान मिळाले तर कार्तिकला 5 व्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्यायला हवी.
आता लक्ष्य टी20 विश्वचषक
भारतीय संघाचं आशिया कप 2022 आव्हान संपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे आशिया कपमधील भारताची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकत सर्वात आधी सुपर 4 मध्ये स्थान मिळवले. पण सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भारत स्पर्धेतून बाहेर पडला. भारताने अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला. दरम्यान आता मात्र टीम इंडिया 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. याआधी भारच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत भारत विविध खेळाडूंना संधी देऊन विश्वचषकाची तयारी करेल.
टी-20 विश्वचषक 2022 साठी16 संघ पात्र
आगामी टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नामिबिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि यूएईनं आधीच आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आता नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी क्वालिफायर टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचून टी-20 विश्वचषकात 2022 मध्ये आपली जागा पक्की केलीय.
हे देखील वाचा-